बांधकाम सुरु असलेल्या रुग्णालयाला भीषण आग, अनेक कामगार अडकले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर रेल्वे स्थानक परिसरातील ‘किंग्ज वे’ रुग्णालयात भीषण आग लागली आहे. इमारतीच्या काही मजल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून इमारतीत सुमारे २० कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत ६ कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी तातडीनं मेयो रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये रुग्णालयात इंटेरिअरची कामं सुरु आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळं लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं.

‘किंग्ज वे’ या रुग्णालयाच्या निर्माणाधीन इमारतीत आज दुपारी सव्वा दोनच्या सुमाराला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. लंच टाइम असल्यामुळे अनेक कामगार जेवण्यासाठी बाहेर गेलेले होते. यामुळे मनुष्यहानी टळली असल्याचं इथले कामगार सांगतात.

नागपूरचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितलं की, “किंग्जवे हॉस्पिटलच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.”