सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली – वृत्तसंस्था : वायदा बाजारात गुरुवारी देखील सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. एमसीएक्सवर गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता ५ जून २०२० च्या सोन्याचा वायदा भाव ०.११ टक्के म्हणजेच ५१ रुपयांच्या घसरणीसह प्रति १० ग्रॅम ४४,८९० रुपयांवर ट्रेंड करत होता. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० च्या सोन्याच्या वायदा भाव गुरुवारी सकाळी १०.१६ ला ०.२७ टक्के म्हणजेच १२४ रुपयांच्या घसरणीसह प्रति १० ग्रॅम ४५,००४ रुपयांवर ट्रेंड करत होता. दुसरीकडे गुरुवारी सकाळी सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत तेजी दिसून आली.

वायदा बाजारात चांदीच्या किमतीतही घसरण दिसून आली. गुरुवारी सकाळी १०.१९ वाजता एमसीएक्सवर ५ मे २०२० च्या चांदीचा वायदा भाव ०.५१ टक्के म्हणजेच २१९ रुपयांच्या घसरीसह प्रति किलोग्रॅम ४२,९२० रुपयांवर ट्रेंड करत होता. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत गुरुवारी सकाळी तेजी दिसून आली. एसीएक्सवर गुरुवारी सकाळी २० एप्रिल २०२० च्या कच्च्या तेलाची वायदा किंमत ५.३३ टक्के म्हणजेच १०१ रुपयांच्या तेजीसह १९९५ रुपये प्रति बॅरल होती.

जागतिक स्तराविषयी बोलायचे झाल्यास सोन्याच्या स्पॉट किंमतीत गुरुवारी सकाळी वाढ दिसून आली. माहितीनुसार गुरुवारी सकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याचे भाव ०.१४ टक्के म्हणजेच २.२९ डॉलरच्या वाढीसह १,६४८.४३ डॉलर प्रति औंस होते. गुरुवारी सकाळी चांदीच्या जागतिक स्पॉट दरामध्येही वाढ दिसून आली. जागतिक पातळीवर, चांदीची स्पॉट किंमत गुरुवारी सकाळी ०.६७ टक्के म्हणजेच ०.१० डॉलर प्रति औंसवर नोंदविली गेली.

दरम्यान, देशव्यापी लॉकडाऊनमुळे गुरुवारी भारतातील सोन्याचे स्पॉट मार्केट बंद राहतील. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने 25 मार्चपासून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. या कालावधीत, आवश्यक सेवा आणि वस्तू वगळता सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक क्रियाकलाप बंद आहेत.