‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत मोठ्या ज्योतिबाची होणार ‘एंट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहाेचली आहे. आतापर्यंत छोट्या ज्योतिबाचं मालिकेत दर्शन होत होतं. आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एंट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रूपात येणार आहे. केदार विजय ग्रंथातील काही भागांना अनुसरून कथा गुंफण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेच्या रूपात ज्योतिबाच्या भव्यदिव्य रूपाचं दर्शन घेता येणार आहे.

 

ज्योतिबाच्या या भव्यदिव्य रूपासोबतच यमाई आणि चोपडाई यांच्यादेखील अवताराची गोष्ट मालिकेमध्ये उलगडणार आहे. त्यामुळे दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेचे यापुढील भाग भक्तिरसाने परिपूर्ण असणार आहेत. या मालिकेत अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) हा मोठ्या ज्योतिबाची भूमिका साकारणार असून, या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे.

ज्योतिबाच्या अनेक पौराणिक कथा वाचण्यासोबतच सर्वांत महत्त्वाची गोष्ट विशाल निकम याने आत्मसात केली आहे ती म्हणजे घोडेस्वारी. कमी कालावधीमध्ये विशाल घोडेस्वारी करायला शिकला आहे. याशिवाय विशालने या भूमिकेसाठी 12 किलो वजनदेखील वाढवलं आहे. विशाल मूळचा सांगलीचा (Sangli) असल्याने कोल्हापुरी (Kolhapur) भाषेचा लहेजा त्याला आपसुकच येत होता. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या यापुढील प्रवासासाठी विशाल खूपच उत्सुक आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

दख्खनचा राजा ज्योतिबा (Jyotiba) या मालिकेच्या भव्यतेविषयी सांगताना निर्माता महेश कोठारे (Mahesh Kothare) म्हणाले, या मालिकेसाठी कोल्हापुरात भाव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. जवळपास दीड महिन्यापासून या सेटचं काम सुरू आहे. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हेदेखील आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत.