Coronavirus : ‘न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स’कडून 22 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना 50-50 लाख रुपयांचे विमा ‘संरक्षण’ देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य सेवा कामगारांना 50-50 लाख रुपयांचा विमा संरक्षण देणार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आरोग्यसेवा कर्मचारी सध्या या विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. सोमवारी वित्त मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले की, ‘अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 26 मार्च रोजी आरोग्य कामगारांसाठी जी घोषणा केली होती, त्या बाबतीत न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सने देशभरातील 22.12 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना 50-50 लाख रुपयांचा आरोग्य विमा प्रदान करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

गेल्या गुरुवारी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 1.70 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा हा एक भाग आहे. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कामगार यांच्यासह काही जण विमा संरक्षणात येतील. सीतारमण म्हणाल्या की हे विमा संरक्षण तीन महिन्यांसाठी असेल.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांना दिलेल्या पुष्टीकरण पत्रात न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सने म्हटले आहे की, ‘आम्ही याची खातरजमा करतो की जोखीम कव्हरेज तातडीने लागू झाले आहे आणि हे कव्हरेज 30 जून 2020 पर्यंत सुरू राहील. तसेच प्रीमियम पेमेंट प्रक्रिया सुरू केली गेली आहे. विमा पॉलिसीला मुंबई स्थित न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सच्या दिल्ली विभाग कार्यालयाद्वारा लिहिण्यात आले आहे.

या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की, सफाई कर्मचारी, वॉर्ड-बॉय, परिचारिका, अशा कामगार, पॅरामेडिक्स, तंत्रज्ञ, डॉक्टर आणि तज्ञ आणि इतर आरोग्य कर्मचारी विशेष विमा योजनेत समाविष्ट असतील.