ST महामंडळात ‘स्वेच्छा’ निवृत्तीचा प्रस्ताव, 28 हजार कर्मचारी होणार कमी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महामंडळाने हा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे तब्बल 28 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. BSNL नंतरची ही सर्वात मोठी स्वेच्छा निवृत्ती असणार आहे. एसटी महामंडळाकडून 50 वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती दिली जाणार आहे.

एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे 28 हजार कर्मचाऱ्याची नोकरी जाणार आहे. सध्या महामंडळामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 28 हजार आहे. या निर्णयामुळे महामंडळाला दरमहा 100 कोटी रुपयाच्या पगाराची बचत होणार आहे. स्वेच्छा निवृत्तीसाठी 1400 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. याबाबत महामंडळ राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. राज्य सरकारने महामंडळाच्या निर्णयाला मान्यता देऊन 1400 कोटी रुपये दिले तरच हा निर्णय होऊ शकतो.
क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी

एसटी महामंडळामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी झाले आहेत. यामुळे ही योजना आणण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे. राज्यात एका बसमागे 6:15 कर्मचारी आहेत. देशाच्या 14 राज्याच्या परिवहन मंडळात हे प्रमाण एका बस मागे पाच कर्मचारी असे आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे 2800 कोटींची भर पडली आहे. महामंडळाने पगारासाठी 480 कोटी रुपये सरकारकडे मागितले आहेत.

पगाराची स्थिती काय आहे ?

– 100 दिवसांपासून एसटी सेवा ठप्प

– दिवसाला 22 कोटी उत्पन्नाच्या ठिकाणी 20 लाख रुपये होतंय उत्पन्न

– गेल्या महिन्यात निम्मे पगार

– क्षमतेच्या 10 टक्के गाड्या सुरु

– सध्या 1800 बस सुरु

– एकूण क्षमता 18 हजार 500 बस

– डिझेल, टायर, स्पेअर पार्टचे 800 कोटी थकले

– एसटी पुरवाठादार हवालदील