अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूची दोन दिवसांपासून पुण्यात चौकशी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चौकशी सुरु आहे. फॅन्टम फिल्म कंपनीच्या कथित कर चुकवेगिरी प्रकरणामध्ये बुधवारी सकाळपासून दोघांची चौकशी सुरु असून ही चौकशी शुक्रवारी (दि.5) देखील सुरु राहणार असल्याची शक्यता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

प्राप्तिकर विभागाच्या मुंबईच्या ‘इन्व्हेस्टीगेशन टीम’ने बुधवारी (दि.3) सकाळी फॅन्टम फिल्म कंपनी संदर्भात मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणी छापे टाकले. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या आगामी दोबारा या सिनेमाचे पुण्याजवळ चित्रीकरण सुरु झाले आहे. त्यांचा मागील चार ते पाच दिवसांपासून हिंजवडी परिरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्कम आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन दोघांची चौकशी सुरु केली आहे. त्यांच्यासोबत इतर तीन ते चारजण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशीदरम्यान कोणालाही बाहेर सोडण्यात येत नव्हते. हॉटेल प्रशासनाला तशा सक्त सुचना देण्यात आल्या हत्या. यासंदर्भात हॉटेल प्रशासनाने कश्यप आणि तापसी हे हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याच्या माहितीला दुजोरा दिला नाही. कश्यप आणि तापसी यांची शुक्रवारी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीत करण्यात आलेल्या छापेमारीत प्राप्तिकर अधिकाऱ्यांना मोठी माहिती मिळाल्याचे समजतय. छापेमारी आणि चौकशीमध्ये प्राप्तिकर विभागाचे तब्बल सव्वाशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते आहे.