किसान क्रेडिट कार्ड : 20 हजार बँक शाखांमधून मिळणार शेतकर्‍यांना 3 लाखाचं ‘गिफ्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) देण्यासाठी भव्य मोहीम राबवणार आहे. त्याअंतर्गत 29 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशातील चित्रकूटमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्यात प्रधानमंत्री स्वतः शेतकऱ्यांना केसीसी योजना म्हणजेच केसीसी कार्ड देतील. याच दिवशी सोबतच देशभरातील 20 हजार बँक शाखांत शेतकऱ्यांना केसीसी जारी करून दिला जाईल.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, ‘किसान सन्मान निधी योजना’ लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात यावे, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. जेणेकरुन शेतकरी बँकांकडून सहजपणे कर्ज घेऊ शकतील आणि सावकारांच्या जाळ्यात अडकून आत्महत्या करणार नाहीत. या माध्यमातून शेतीसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार असून हे कर्ज चार टक्के दराने उपलब्ध आहे.

एफपीओला सरकारकडून 15 लाख रुपयांची मदत :
सरकारने पशुसंवर्धन व मत्स्यपालन क्षेत्रालाही केसीसी अंतर्गत आणले आहे. तोमर म्हणाले की, 10,000 नवीन शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) नोंदणीकृत आहेत आणि प्रत्येक एफपीओला शेतीला चालना देण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

किती आहे कर्ज :
बहुतेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून संसदेत एनएसएसओच्या हवाल्यानुसार सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार देशातील प्रत्येक शेतकर्‍यावर सरासरी 47 हजार रुपये कर्ज आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यावर सरासरी 12,130 रुपयांचे सावकारी कर्ज आहे.

तीन कोटी नवीन कार्ड बनविण्याचे टार्गेट :
सध्या देशात 6.67 कोटी क्रेडिट कार्ड सक्रिय आहेत. पंतप्रधान-किसान सन्मान निधीचे सुमारे 3 कोटी लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडे केसीसी नाही. तर बँकांकडे आधीच पीएम किसान लाभार्थ्यांची जास्तीत जास्त माहिती उपलब्ध आहे. म्ह्णूनच बँकांना शेतकऱ्यांना केसीसी देण्यात अडचण होणार नाही.

You might also like