FCI च्या 1 लाखाहून अधिक मजूर आणि कर्मचार्‍यांना मार्च 2021 पर्यंत मिळणार 35 लाखाचा ‘कोरोना’ विमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय ग्राहक व्यवहार खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी एफसीआयच्या ८० हजार कामगारांसह एकूण १,०८,७१४ कर्मचार्‍यांना ३५ लाखांपर्यंत विमा देण्याची मुदत वाढवल्याची मोठी घोषणा केली आहे. रामविलास पासवान यांनी ट्वीट केले की, एफसीआयच्या एकूण १,०८,७१४ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटूंबाला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय एफसीआयने २४ सप्टेंबर २०२० पासून ६ महिन्यांसाठी वाढवला आहे.

पासवान म्हणाले की, सरकार या संकट काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या आपल्या कोरोना वॉरियर्सना प्रत्येक सुरक्षा देण्यास वचनबद्ध आहे. याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वांना मिळणार विमा
मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या एफसीआय कर्मचार्‍यांना दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, जमाव हल्ले किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जात होती. पण त्यात एफसीआयचे नियमित व कंत्राटी कामगार समाविष्ट केले नाहीत. कोरोना विषाणू संसर्ग काळात काम करणाऱ्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना जीवन विमा संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

२४ मार्च २०२१ पर्यंत एफसीआय भारतात ड्युटी पार पाडताना कोविड-१९ संसर्गामुळे मृत्यू झाल्यास एफसीआयच्या नियमित कामगारांसाठी १५ लाख, करारबद्ध कामगारांसाठी १० लाख, प्रवर्ग १ च्या अधिकाऱ्यांसाठी ३५ लाख, प्रवर्ग २ च्या अधिकाऱ्यांसाठी ३० लाख, श्रेणी ३ आणि ४ कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना २५-२५ लाख नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था केली गेली आहे.