सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी ! आता पुढच्या महिन्यात होईल महागाई भत्त्यामध्ये 4 % वाढीची घोषणा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. यापूर्वी कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ दिली गेली नव्हती. मात्र, आता ही वाढ दिली जाणार असल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

‘नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएम-स्टाफ साईड’ने सांगितले, की केंद्र सरकार जून 2021 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीएमध्ये वाढ करू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) बेसिक सॅलरीचा किमान 4 टक्के वाढ केली जाणार आहे. याबाबत ‘नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएम’चे सेक्रेटरी स्टाफ साईड शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले, की ‘आम्ही अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभाग आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने संवाद साधत आहोत. कोरोनाच्या संकटामुळे महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून दरवेळी जवळजवळ एका महिन्यासाठी टाळला जात आहे. त्यामुळे आता डीएमध्ये जून महिन्यात वाढ केली जाऊ शकते.

दरम्यान, महागाई भत्त्यात वाढ केली जाणार अशी माहिती अनेकदा दिली गेली. मागील वर्षीही कोरोना संकटामुळे ही वाढ दिली नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही वाढ झाली तरीही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात फार मोठा फरक पडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.