खुशखबर ! SBI चे नवीन गिफ्ट ; नवीन घर खरेदीदारांसाठी तब्बल २.६७ लाखांचा ‘डिस्काउंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI ) नवीन घराचे स्वप्न साकार करण्यासाठी एक आकर्षक योजना सुरु केली आहे. यामध्ये जे पहिल्यांदाच घर विकत घेणार आहेत त्यांना पंतप्रधानांच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत (२. ६७ लाख) अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान गृह कर्जाच्या व्याजानुसार दिले जात आहे. म्हणजेच गृह कर्जावर तुम्हाला २. ६७ लाख व्याज द्यावे लागणार नाही. सध्या SBI गृहकर्जाचा वार्षिक व्याज दर ८. ७५ % टक्के आहे.

अनुदानाची मर्यादा –

कर्जाच्या रकमेनुसार अनुदानाची रक्कम निश्चित केली जाते. यापूर्वी जुन्या नियमानुसार ज्यांचे उत्पन्न ३ लाखांपासून तसेच ६ लाखांपर्यंत आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेता येत होता. मात्र आता अनुदानाच्या नव्या नियमानुसार उत्पन्नाची मर्यादा वाढवून टी १२ ते १८ लाख रुपये करण्यात आली आहे.

सरकारी अनुदान –

६.५ % क्रेडिट लिंक्ड अनुदान फक्त ६ लाख रुपये कर्जावर उपलब्ध आहे. १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ९ लाखांपर्यंतच्या कर्जावर ४ % व्याज अनुदानाचा फायदा मिळेल. त्याचप्रमाणे १८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १२ लाखांपर्यंतच्या कर्जावरील ३% व्याज अनुदान मिळेल.

प्री-पेमेंटवर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही –

आपल्या ग्राहकांचे कर्ज लवकरात लवकर फिटावे म्हणून SBI कडून प्री-पेमेंटची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येणार नाही. त्यामुळे ग्राहक प्री-पेमेंटद्वारे व्याजदराची बचत करू शकतात. सध्या गृहकर्जासाठी ग्राहकांचा खाजगी बँकांकडे ओढा वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर SBI ने ही नवीन योजना आणली आहे.