विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! जात पडताळणीबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले ‘हे’ आदेश, जाणून घ्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या राज्यात कोरोनामुळे विविध जिल्हयात वेगवेगळ्या तारखेनुसार लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच जून, जुलै महिना सुरू असला तरी अजून शाळा आणि महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. कोरोना विषाणूचा आणखी फैलाव होऊ शकतो, त्यामुळे लॉकडाऊन आणि अनलॉकची प्रक्रिया सरकार राबवत आहे. मात्र, यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. यातच आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्ष नाना पाटोल यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत महत्वपूर्ण सूचना अनुसूचित जाती, जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीला दिला आहे.

इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असतात. आता हीच जात पडताळणी प्रमाणपतत्रे वितरित करण्यासाठीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. अशा सूचना त्यांनी अनुसूचित जाती, जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीला दिल्या आहेत. त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून ज्यांनी यासाठी अर्ज केला आहे, त्यांची आता जात पडताळणी प्रमाणपत्रबाबातची प्रकरणे आता लवकर निकाली निघतील, अशी आशा आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, गडचिरोली व अमरावती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीद्वारे गोवारी (गोंड गोवारी) जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अनेक अडचणी येतात. या अडचणींबाबत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी नाना पटोले बोलत होते.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक तथा सदस्य सचिव मनोज चव्हाण, आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे संयोजक दामोदर नेवारे, तक्रारदार नारायण सहारे, मारोतराव वाघाडे, वासुदेव नेवारे, गजाना कोहळे तसेच संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन काळात प्रमाणपत्र मिळविणे विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होत असून आता विद्यार्थ्यांसमोर पुढील शैक्षणिक प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता समितीने तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावीत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रांबाबत ज्यांच्या तक्रारी आहेत, त्या प्रकरणांची खात्री करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना नाना पटोले यांनी यावेळी दिल्या.

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येतील. हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील सर्व विद्यार्थ्यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

याबाबत उपस्थित संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सूचित केले आहे. अमरावती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने प्रमाणपत्राची प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, अशाही सूचनाही नाना पटोले यांनी या बैठकीदरम्यान केल्या.