शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, SEBI नं दिली नवीन नियमांना मान्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शेअर बाजार नियामक सेबीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (एनएसई) गुंतवणूकदारांच्या ई-केवायसी आधार प्रमाणीकरणासाठी मान्यता दिली आहे. यामुळे सेबीने मे महिन्यामध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल), नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), सीडीएसएल व्हेंचर्स, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट, एनएसई डेटा अँड अ‍ॅनालिटिक्स, सीएएमएस इन्व्हेस्टर सर्व्हिसेस आणि कम्प्यूट एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (सीएएमएस) ला याची मान्यता दिली होती. सोप्या भाषेत सांगायचे तर आता एनएसईला गुंतवणूकदारांचे ई-केवायसी करण्याचा हक्क मिळाला आहे.

एनएसईला यूआयडीएआयमध्ये केवायसी वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी लागेल

सेबीने एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या संदर्भातील निर्धारित अटींचे पालन करण्यासाठी यूआयडीएआयच्या आधार प्रमाणीकरण सेवा म्हणून काम करेल. यासाठी एनएसईला यूआयडीएआयमध्ये केवायसी वापरणारी एजन्सी (केयूए) म्हणून नोंदणी करावी लागेल. यूआयडीएआयमध्ये नोंदणी केल्याने सेबी मध्ये नोंदणीकृत मध्यस्थ किंवा म्युच्युअल फंड वितरकांना त्यांच्या ग्राहकांना केवायसी करण्याचा अधिकार मिळेल.

सेबीमध्ये नोंदणीकृत मध्यस्थ किंवा म्युच्युअल फंड वितरक, जे केयूएमार्फत आधार प्रमाणीकरण सेवा वापरू इच्छित आहेत, त्यांना केयूएबरोबर करार करावा लागेल. तसेच केयूएकडे सब-केयूए म्हणून नोंदणी करावी लागेल. हा करार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ठरवलेल्या मानकांवर आधारित असेल. वेळोवेळी केयूए आणि सब-केयूएला यूआयडीएआयने वर्णन केलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यूआयडीएआय कडून सीडीएसएलला ऑगस्टमध्ये आणि सीडीएसएल व्हेंचर्सला जुलैमध्ये स्थानिक प्रमाणीकरण वापरकर्ता एजन्सी (एयूए) किंवा केयूए म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.