‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढल्याने ठाण्यातही 19 जुलैपर्यंत पुन्हा वाढवला ‘लॉकडाऊन’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 12 जुलैपर्यंत असलेला लॉकडाऊन आता 19 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहेत.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन 19 जुलैला सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविला आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ठाणे शहरात 2 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपासून 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी काही कालावधीसाठी लॉकडाऊन वाढवणे आवश्यक असल्याचे महानगरपालिका आयुक्त यांनी म्हंटले. लॉकडाऊनमध्ये केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींनाच कामावर जाण्याची मुभा असेल. या व्यतिरिक्त बाकीच्या अटी आणि नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत, असेही आयुक्त यांनी आदेशात म्हटले आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ठाणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या अधिक प्रमाणावर वाढल्याचे आढळले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावे लागेल, असे वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कळवा, मुंब्रा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या पालिका क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी संसर्ग वाढला आहे. त्या भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन केला आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजारांवर पोहोचलीय.

दरम्यान, मागील आठवड्यात लॉकडाऊननंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये ‘कोरोना’ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. यात लोकप्रतिनिधींनी पुन्हा एका लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती.