बिहार मध्ये १७ लाख स्थलांतरित मजुराने भरून गेले क्वारंटाईन सेंटर

कोरोना बाधितांमध्ये बहुतांशी बाहेरुन आलेले, सेंटर करणार बंद

पाटणा : वृत्तसंस्था – विशेष श्रमिक एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर बिहार सरकारने सुरु केलेली ६ हजार क्वारंटाईन सेंटरमध्ये १७ लाख मजूरांना ठेवण्यात आले आहे. ही सर्व क्वारंटाईन सेंटर भरुन गेली असून आता बाहेरुन आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १५ जूननंतर ही सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करण्यात येणार आहे. त्या सर्वांना घरी पाठविण्यात येणार आहे.

सर्वाधिक कोरोना बाधित असलेल्या महाराष्ट्रात सध्या सुमारे ३६ हजार नागरिक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर ६ लाख नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून काही लाख मजूर बिहार व अन्य राज्यात गेले. परंतु, राज्यात केवळ काही हजार विद्यार्थी व इतर नागरिक परत आले. त्यामुळे देशभरातून आलेल्या मजूरांना क्वारंटाईन करुन ठेवणे व त्यांना सुविधा पुरविणे बिहार सरकारच्या नाकीनऊ येत आहे.

सध्या बिहारमध्ये ३ हजार ९२६ कोरोना बाधितांची संख्या असून त्यातील २ हजार ७४२ रुग्ण हे ३ मेनंतर परराज्यातून आलेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र ६७७, दिल्ली ६२८, गुजरात ४०५, हरियाना २३७ रुग्ण आले होते. अन्य रुग्ण उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणमधून परतलेले आहेत.

आता रेल्वेने येणार्‍या मजूरांना थेट त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे. तसेच त्यांची नोंदणी करणेही बंद करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. येणार्‍यांची थर्मल चाचणीही बंद केली जाणार असून यापुढे केवळ आजारी मजूरांच्या मदतीसाठी रेल्वे स्टेशनवर वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहे. मात्र, राज्यात घरोघरी जाऊन करण्यात येत असलेले सर्व्हेक्षण काम आणि अन्य वैद्यकीय सुविधा सुरुच राहणार आहेत.