बीड : जिल्हयात धुमाकूळ घालणार्‍या त्या नरभक्षक बिबटयाला मनुष्यहानी टाळण्यासाठी ठार मारण्याचे आदेश

आष्टी : पोलीसनामा ऑनलाईन – मनुष्यहानी टाळण्यासाठी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच्या परवानगीचे आदेश राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्यवन संरक्षक नितिन काकोडकर यांनी दिला आहे. याबाबत आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस यांनी पत्र व्यवहार केले होते.

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात जिल्ह्यात अनेकांनी जीव गमावला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी असून बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वनपरिक्षेत्र आष्टी अंतर्गत सुरुडी , किन्ही , मंगरुळ, पारगाव जो, तसेच पाटोदा तालुक्यातील जाटवड परिसरात तसेच सोलापुर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील मौजे लिंबेवाडी परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे बिबट्याला पिंजराबंद करावे, शक्य न झाल्यास ठार मारण्याची परवानगी प्रधान मुख्यवन संरक्षकांनी दिली आहे. उपद्रवग्रस्त क्षेत्रात पुन्हा अनुचित घटना घडणार नाहीत, या करिता नियमित गस्त, कॅमेरे ट्रॅप्सद्वारे सनियंत्रण, बिबटच्या अस्तित्वदर्शक सर्व पुरावे गोळा करण्याची कामे तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये मानव वन्यजीव संर्घष टाळण्यासाठी जनजागृती करणे व बिबटयाच्या हालचालीची माहिती तात्काळ प्राप्त करण्यास आवश्यक जाळे उभारणे याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद केले आहे.