…म्हणून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची व नेत्यांची बोलवली तातडीची बैठक

पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलवली आहे. दोन सत्रात ही बैठक होणार आहे. महाआघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरणं आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे.

अनेक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी बॅकफूटवर जावं लागलं आहे. यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून तर पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात होणाऱ्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सचिन वाझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना आणि राष्ट्रवादीत झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार या बैठकीत घेणार आहेत.

रेणू शर्मा नावाच्या तरुणीनं धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. या प्रकरणी त्यांनी गुन्हादेखील दाखल केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. परंतु तरुणीनं नंतर गुन्हा मागे घेतल्यानं मुंडेंना दिलासा मिळाला होता.

मुंडे प्रकरण ताजं असतानाच पुण्यात पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं आत्महत्या केली. शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव आल्यानं त्यांची मोठी अडचण झाली. त्यांच्या 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानं त्यांना अखेर पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईत सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून अनेक धक्कादायक खुलासे केले. कायदा आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणी वक्तव्य केलं होतं. फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात विशेष हक्कभंग आणला.

स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाली. एनआयएनं केलेल्या या अटकेमुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे. त्यामुळंच आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राष्ट्र्वादीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे.