Coronavirus : सोलापूरात 8 ते 15 मे पर्यंत कडक संचारबंदी ! केवळ अत्यावश्यक सेवा सुरु, भाजीपाला, दूध विक्री पूर्णत: बंद

सोलापूर : ऑनलाइन टीम – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत कडक संचारबंदी लागू केली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे.

गुरुवारी (दि.6) सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 8 मे ते 15 मे या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक संचारबंदी असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील. बाकी सर्व बंद राहील अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.

सोलापूर शहर व जिल्ह्यात येत्या 8 तारखेपासून रात्री 8 वाजल्यापासून 15 तारखेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व सेवा बंद राहणार आहेत. जिल्ह्यात कडक संचारबंदी राहील. मेडिकल वगळता किराणा दुकाने, भाजीपाला, दूध विक्रीही पूर्णत: बंद राहील केवळ पास धारक दूध विक्रेत्यांना दूध घरपोच देता येईल. मार्केट यार्ड देखील बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी रात्री दिली आहे.

हे आदेश सोलापूर शहर व ग्रामीण परिसरात लागू राहतील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात नवीन कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नवीन निर्बंधांची घोषणा केली.