मोठी बातमी ! ठाकरे सरकारने दिला आदेश अन् सोलापुरातील स्थायी समितीच झाली निलंबित

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आलेल्या सर्व सभासदांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या आदेशानुसारच सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे आता यावर नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या समितीचे भविष्य पुन्हा लांबणीवर पडले आहे.

स्थायी आणि परिवहन समितीची निवडणूक 5 मार्चला होणार होती. मात्र, एमआयएमच्या गटनेतेपदाच्या वादामुळे स्थगिती दिली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर 15 मार्च रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि राज्य सरकारने स्थायी समितीतील सर्वच सदस्यांचे निलंबन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार हे निलंबन झालेही. तसेच या दोन्ही समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रियाही रद्द झाली आहे.

सदस्यांची झाली होती निवड

सोलापूर महानगरपालिकेतील स्थायी आणि परिवहन समितीच्या सदस्यांची निवड काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर त्या दोन्ही समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती. मात्र, एमआयएमच्या गटनेतेपदाच्या वादामुळे गेल्यावेळी निवडणूक स्थगित झाली होती. त्यानंतर मात्र अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आलेल्या सदस्यांचेच निलंबन शासनाने केले आहे.

30 दिवसांपर्यंत नोंदवा हरकती

दोन्ही समितीतील सदस्यांची निवड ही महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ च्या तरतूदींशी विसंगत आहे. त्यामुळे महापालिकेचा ठराव रद्द करण्यात येत आहे. ज्या सदस्यांना या निर्णयाबाबत काही हरकती असल्यास त्यांनी आपल्या हरकती 30 दिवसांपर्यंत नोंदवू शकता, असेही या आदेशात म्हटले आहे.