26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – एक मोठी बातमी समोर आली आहे. 151 तालुक्यात राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर  करण्यात आला आहे. धक्कादायक बाब अशी की, 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. इतकेच नाही तर राज्यातील 39 तालुके मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने ऐन वेळेस दडी मारल्याने  राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती बनली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती.
राज्य सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यावेळी दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य तालुक्यांबाबतही माहिती दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करुन त्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर, 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती.  आज राज्य सरकारकडून राज्यातील 151 तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळ घोषित केल्याचे आदेश 31 ऑक्टोबर (आज) पासून अंमलात येत आहेत. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे.