Solapur News : 10,000 रुपयाची लाच घेताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कुर्डूवाडी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास माढा तालुक्यातील कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.

तक्ररदार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. संतोष अडगळे यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर लाचलुपच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची पडताळणी केली असता डॉ. अडगळे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज दुपारी बाराच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.