कामाची गोष्ट ! आजपासून रेल्वेची तात्काळ तिकीट बुकिंग सेवा सुरू, ‘या’ पध्दतीनं करा Ticket Book

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, सध्या काही निवडक १५ मार्गांवरती राजधानी विशेष ट्रेन तर १ जूनपासून २०० स्पेशल ट्रेन चालवण्यात येत होत्या. आता या ट्रेनचे २९ जूनपासून तत्काळ तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर प्रवासी ३० जूनच्या प्रवासाचे तिकीट आरक्षित करु शकतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तत्काळ बुकिंग सेवा सुरु केली आहे. रेल्वेने चालविलेल्या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आणि एसी स्पेशल ट्रेन्समध्ये तत्काळ तिकीट बुकिंगची सेवा आजपासून सुरु झाली आहे. मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा ३० जून आणि त्यानंतरच्या धावणाऱ्या प्रवाशांसाठी सुरु होईल.

केव्हा सुरु होईल तत्काळ तिकीट बुकिंग?

प्रवासासाठी ३० जूनपासून रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट सुविधेचा लाभ घेता येईल. तत्काळ तिकिटे एसी क्लाससाठी सकाळी १० पासून आणि स्लीपर क्लाससाठी सकाळी ११ पासून बुक केली जाईल. तर भारतीय रेल्वेने गुरुवारी प्रसारित केलेल्या आदेशानुसार, १२ ऑगस्ट पर्यंत मेल आणि एक्सस्प्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन दिलेल्या आदेशानुसार हे स्पष्ट करण्यात आलं की, १२ ऑगस्टपर्यंत आता फक्त विशेष गाड्या चालवण्यात येतील.

कसे आणि केव्हा मिळेल तत्काळ तिकीट?

द्वितीय श्रेणी अथवा स्लीपरसाठी तत्काळ तिकिटे बुकींग करायची असेल तर त्याची वेळ सकाळी ११ वाजता आहे. एसी तिकिटासाठी बुकिंगची वेळ सकाळी १० वाजता आहे. काही वेळा तिकिटे मिनिटांत किंवा सेकंदात संपून जातात. अशा स्थितीत वेळेत लॉगइन करणे किंवा काउंटरपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे. परंतु, या नियमांत बदल केल्याबद्दल रेल्वेकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही, त्यामुळे तुम्हाला आधीपासून सुरु असलेल्या नियमांबाबत सांगत आहोत. तत्काळ तिकीट केव्हा बुक केले जाते, याबद्दल अनेक प्रवाशांत संभ्रम निर्माण होतो. समजा तुम्हाला ३० जून ला प्रवास करायचं असेल तर तुम्हाला एक दिवसा पूर्वी म्हणजेच २९ जून रोजी सकाळी १० किंवा अकरा वाजता बुकिंग करावे लागेल. तसेच तत्काळ तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही. संपूर्ण रक्कम रेल्वेकडून वजा करण्यात येईल. ट्रेन रद्द झाल्यास मग तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे परत मिळतील.