मास्क वापरा अन्यथा 1000 दंड भरा, प्रशासनाचा नवा आदेश जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील चार दिवसात सतत पाच हजाराच्या पुढे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. राज्यातील वाढती कोरोना संक्रमणाची प्रकरणं लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरु राहणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात.

मुंबई तसेच राज्यात आता मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबत मुंबई महापालिकेने नवा आदेश जारी केला आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. जुलै महिन्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे आता रस्त्यांवर पोलिसांनीही नाकाबंदी वाढवली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात असताना अनेक लोक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बरेच लोक मास्कशिवाय सर्रासपणे फिरताना दिसत आहेत.

त्यामुळे मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी जाताना, प्रवास करताना किंवा घराबाहेर पडल्यावर तसेच खासगी वाहनांमध्ये प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केलं आहे. मास्क न लावता घराबाहेर पडल्यास आणि लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्यास 1 हजार रुपये दंड वसूल केला जाणार असल्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.

नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोविड 19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढू शकतो, असे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र तरीही काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक व इतरांची सुरक्षितता धोक्यात आणत आहेत. या पार्श्वभूमीवर, मास्क न लावणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असून तसं परिपत्रक त्यांनी काढलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like