भरती प्रक्रिया : मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात घातला राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात राडा घातला. भरती प्रक्रियेतून एसईबीसी (SEBC) कोट्यातील मराठा परीक्षार्थींना वगळल्याने आक्रमक पवित्रा घेत मराठा क्रांती मोर्चाने पीडित परीक्षार्थींना घेऊन महावितरण कंपनीविरुद्ध आंदोलन केले. तसेच महावितरण भरती प्रक्रियेतील अर्ज पडताळणी बंद पाडली.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ४९५ उमेदवारांची नियुक्ती रखडली. त्यात महावितरण कंपनीच्या २००० पदांसाठी डाक्युमेंट पडताळणी सुरू होती. मात्र, यातून एसईबीसी (SEBC) उमेदवारांना वगळल्याने मराठा क्रांती मोर्चाने ही प्रक्रिया बंद पाडली.

महावितरण उपकेंद्र सहायक पदाकरिता दि. ९ -७- २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाइन फॉर्मची अंतिम तारीख २६-७-२०१९ होती. ऑनलाइन क्षमता चाचणी २५-८-२०१९ रोजी घेण्यात आली. त्यानंतर २५ मार्च २०२० रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली. उमेदवारांची निवड यादी २८-६-२०२० जाहीर करण्यात आली.

ही यादी प्रसारित केल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व नियुक्त्या तेव्हाच करणे अपेक्षित होते. मात्र, एसईबीसी (SEBC) कोट्यातील उमेदवारांना वगळून अर्ज पडताळणी २ डिसेंबर २०२० रोजी शटर बंद करून पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात सुरू होती. मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत कार्यालयात जाऊन पडताळणी प्रक्रिया बंद पाडली. त्याचसोबत एसईबीसी (SEBC) आरक्षण कोट्यातून निवड झालेल्या ४९५ उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्र द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.