तलाठी पदासाठी मोठी भरती, दोन दिवसात निघणार जाहिरात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या दोन ते तीन दिवसात तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे समजत आहे. सुमारे 1809 पदांची ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे तलाठ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

महसूल चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रलयात बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात ही बैठक घेण्यात आली. सातबारा संगणकीकरण मोहिमेत राज्यातील तलाठ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे तलाठ्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळावी, अशी मागणी महासंघाच्यावतीने करण्यात आली. यावर पाटील यांनी भाष्य केलं आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, “तलाठी कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. अशा कार्यालयांना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली असून नागपूर विभागासाठी 2 कोटी व अमरावती विभागासाठी 5 कोटी 13 लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.” याशिवाय जे काही उर्वरीत विभाग आहेत त्यांच्यासाठी लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. तसेच मंडल अधिकाऱ्यांसाठी सज्जास्तरावरील तलाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी यांनी तयार करून पाठविण्याचे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, “राज्यातील 80 टक्के तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले आहेत. उर्वरित तलाठ्यांना लवकरच लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. मंडल अधिकारी, अव्वल कारकून यांची अदलाबदलीने पदे भरण्यासंदर्भातील शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षणासाठी धोरण तयार करण्यात येईल व त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.”

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, उपाध्यक्ष गौस महमंद लांडगे, नाशिक जिल्हा अध्यक्ष निळकंठ उगले, समन्वय महासंघाचे सदस्य तानाजी सावंत आदी उपस्थित होते.