Advt.

४ हजार दुष्काळग्रस्त गावांच्या कृषी कर्जवसुलीस स्थगिती 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. राज्यातील ४५१८ गावांना दुष्काळामुळे राज्य सरकारने कर संकलन आणि अन्य सवलतींचा लाभ जाहीर केला आहे. आज दुपारी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. या मदतीचा पहिला हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. राज्यातील विभागिय आयुक्तांकडे हा निधी सोपविण्यात आला आहे.  त्यांच्याद्वारे हा निधी दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना दिला जाणार आहे. तेथील तहसीलदार हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करणार आहेत. यामध्ये काही गडबड होऊ नये यासाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी हा निधी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या मराठवाड्यासह विदर्भातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं जानेवारीमध्ये ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.