रायगड किल्ल्यावरील ‘वाघ्या’ कुत्र्याचा ‘पुतळा’ हटवणारे 73 जण ‘निर्दोष’

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन –  रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांची माणगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जहांगीर यांनी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. संभाजी ब्रिगेडच्या कार्य़कर्त्यांनी 2012 मध्ये हा पुतळा हटवला होता. याप्रकरणी पोलिसांनी 73 जणांना अटक केली होती.

अटक करण्यात आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांवर माणगाव सत्र न्यायालयात खटला सुरु होता. या खटल्याचा निकाल लागला असून 73 जणांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष सुटका केली. या निकालाच्या अनुषंगाने माणगाव सत्र न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा जगदीश्वर मंदिर परिसरात महाराजांच्या समाधीच्या मागे होता. 2012 मध्ये वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता.

या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्याही जप्त केल्या होत्या. महाड न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणी बसवला होता.

महाड न्यायालयातून हा खटला माणगाव सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. माणगाव न्यायालयात वाघ्या कुत्रा हटवल्या संदर्भात खटला सुरु होता. न्यायालयाने कार्यकर्त्यांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. त्यामुळे आठ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –