दिलासा ! पुढच्या महिन्यात गॅस सिलेंडरचे दर ‘घटणार’, सरकारनं दिले ‘संकेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती सिलेंडरच्या किंमती मार्च महिन्यात कमी होतील, असा विश्वास पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. धमेंद्र प्रधान सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मागील काही महिन्यांपासून घरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे. हे काही खरे नाही. फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किंमतीमुळे घरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ केल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील सद्य परिस्थिती पाहता सिलेंडरच्या किमती लवकरच खाली येण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारात किंमत वाढल्याचा परिणाम
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशातील गॅस सिलेंडरच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण होतो. चालू महिन्यात जरी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झालेली असली तरी, पुढील महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे, असे प्रधान यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात सिलेंडरच्या किंमतीत 144.5 रुपयांची वाढ झाली. जागतिक बाजारात किमती वाढल्याने सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.

सध्याच्या सिलेंडरच्या किंमती
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार, 14.2 किलो गॅस सिलेंडरचे दर दिल्लीत वाढून 858 रुपये झाले आहेत. पूर्वी याच सिलेंडरचा दर 814 रुपये होता. मुंबईत 747 रुपयांवरून 896 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये 684.50 वरून 829.50, तर कोलकातामध्ये 734 रुपयांवरून 881 रुपये किंमत झाली आहे.