दिलासादायक ! आता 500 रुपयांत होणार कोरोनाची RTPCR चाचणी, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

पोलीसनामा ऑनलाईनः राज्यात खासगी प्रयोगशाळांत करण्यात येणा-या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल केले आहेत. सरकारने जारी केलेल्या सुधारित दराप्रमाणे आता कोरोना निदानासाठी केल्या जाणा-या आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीसाठी 500 रुपये आकारले जातील. तर रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी केले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपयांत केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी (दि. 31) केली आहे. याबाबत आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

Advt.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये होणा-या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित केले जात आहेत. आतापर्यंत 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केल्या आहेत. तब्बल 4500 रुपयांवरून आता नव्या सुधारित दरानुसार 500 रुपयांत ही चाचणी करणे प्रयोगशाळांना बंधनकारक केले आहे. यापूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांत चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करून दर कमी होते. आजच्या निर्यानुसार कोरोना चाचण्यांसाठी 500, 600, 800 रुपये दर निश्चित केले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वारंनटाईन सेंटर मधील प्रयोगशाळांतून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारले जातील. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे.