EPFO चं 64 लाख पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट ! लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 64 लाख पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला जमा करण्याच्या नियमातही मोठा बदल केला आहे. पेन्शन घेण्यासाठी पेन्शनधारक आता आपल्या सोयीनुसार कधीही ऑनलाइन हयातीचा दाखला जमा करू शकतात. लाईफ सर्टिफिकेट सबमिशनमध्ये झालेल्या या बदलाने एम्प्लॉयी पेन्शन स्कीम (ईपीएस), 1995 च्या 64 लाख पेन्शनर्सला फायदा होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निणी संघटनेने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

लाईफ सर्टिफिकेट 1 वर्ष वैध

ईपीएफओने ट्विटमध्ये लिहिले आहे, पेन्शनधारक आता आपल्या सोयीनुसार वर्षातील कोणत्याही वेळी ऑनलाइन माध्यमातून हयातीचा दाखला जमा करू शकतात. सबमिशनच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत हे लाईफ सर्टिफिकेट वॅलिड राहिल. लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला हा पेन्शनर जिवंत असल्याचा पुरावा असतो. तो जमा न केल्यास पेन्शन मिळणे बंद होते. आतापर्यंत पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये आपले लाईफ सर्टिफिकेट त्या बँकेत जमा करावे लागते, जेथून पेन्शन मिळते.

नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट जमा न केल्यास जानेवारी महीन्यातील पेन्शन मिळत नाही. परंतु, आता ईपीएफओच्या नव्या सुविधेनंतर वर्षाच्या कोणत्याही कालावधीत लाईफ सर्टिफिकेट जमा करता येईल. एकदा सबमिट केल्यानंतर हे पुढील 12 महिने वैध राहते.

कसे मिळेल ऑनलाइन लाईफ सर्टिफिकेट ?

आता बँक मॅनेजर किंवा कोणत्याही गॅझेटेड अधिकार्‍याच्या मदतीने लाईफ सर्टिफिकेट बनवण्याची गरज नाही. आता ईपीएफओ ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट करता येईल. तसेच पेन्शन डिस्बर्सिंग बँक, उमंग अ‍ॅप किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे सुद्धा लाईफ सर्टिफिकेट सबमिट करता येईल. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे जरूरी आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर, पेन्शन पेमेन्ट ऑर्डर, बँक अकाउंट डिटेल्स आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

डिजिटल लाईफ सर्टिफिकेटसाठी रजिस्ट्रेशन
सीएससी, बँका आणि सरकारी ऑफिसेसद्वारे चालवण्यात येत असलेल्या जीवन प्रमाण सेंटरद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेशनसाठी रजिस्ट्रेशन करता येते. कम्प्यूटर, मोबाईल किंवा टॅबलेटवर क्लाएंट अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकतात. याची संपूर्ण माहिती jeevanpramaan.gov.in वरून घेता येईल.