अजित पवारांचे ‘ते’ बंड आणि सत्तासंघर्षातील पडद्यामागील ‘घडामोडीं’चा झाला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षासाठी ज्या घडामोडी झाल्या त्या संपूर्ण राज्याने पाहिल्या. राज्याच्या राजकारणात घडलेल्या सत्तासंघर्षाच्या घडामोडीमुळे दोन मित्र दूरावले गेले आणि जास्त जागा मिळून देखील भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन होवून सहा महिने होत आले. परंतु सहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे जो राजकीय भूकंप झाला होता आणि राज्याच्या राजकारणात जी खळबळ उडाली होती त्याच्या मागिल सत्य समोर आले नव्हते. मात्र, आता त्या बंडाच्या आणि पडद्याआड घडलेल्या घडामोडिंचा मोठा खुलासा झाला आहे.

राज्याच्या राजकारणात सहा महिन्यांपूर्वी जो सत्तासंघर्ष चालला त्याने राज्यातील राजकारण बदलून गेलं. आणि एकेकाळचे मित्रपक्ष असलेले भाजप-शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून दुरावा निर्माण झाला. सत्तासंघर्षाच्या या काळात राज्यात घडणाऱ्या वेगवान घडामोडी सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. राज्यातील प्रमुख नेते एकमेकांच्या भेटीगाठी करत होते. राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती.

क्षणाक्षणाला बलणाऱ्या घडामोडींमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत सर्वांना धक्का देत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवत धक्का दिला. या तीन पक्षांना राज्यात सरकार स्थापन करण्याच्या आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात येणार असं चित्र निर्माण झालं.

पण अचानक एके दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळीच शपथ घेत अनेकांना धक्का दिला. राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले याची चर्चा रंगू लागली. अजित पवारांचे हे बंड राज्याच्या राजकारणात चांगलेच गाजले. शरद पवारांचे पुतणे असलेले अजित पवार यांनी बंड का केलं ? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या ‘चेकमेट’ या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यात अजित पवार यांच्या बंडाबाबतही गौप्यस्फोट केल्याचे आढळते.

सुप्रिया सुळे यांना अडिच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद तर जयंत पाटील यांना गृह खात्यासह उपमुख्यमंत्री करायचं हे जवळपास निश्चित झालं होतं. या कारणामुळे अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरु झाली. अजित पवारांचे हे बंड हे कार्यकर्त्यांसाठी न उलगडणारं कोडं आहे. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हे बंड झालं असावं अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. पडद्यामागे घडणाऱ्या अनेक गोष्टी या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

अजित पवार यांनी बंड का केलं ? याबाबत चेकमेट पुस्तकात दावा करण्यात आला आहे. शिवसेनेसोबत वाटाघाटी झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना देण्याचं ठरलं. त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आलं. एवढच नाही तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद मिळणार असल्याने अजितदादा प्रचंड नाराज झाले. यामुळे आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे अजित पवारांनी घेतलेला निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरला.

दुसरीकडे राज्यातील सत्ता हातातून जात असल्याने देवेंद्र फडणवीस हे देखील ताणावाखाली होते. आदल्या 22 नोव्हेंबरच्या रात्री बऱ्याच घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीची बैठकीतून अजित पवार बाहेर पडले अन् थेट घर गाठले. त्यानंतर काहीवेळाने अजित पवार पुन्हा घरा बाहेर आले. गाडी अर्ध्या वाटेत गेल्यावर त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. अजित दादा गाडीतून खाली उतरले त्यांनंतर त्यांनी ड्रायव्हरला जाण्यास सांगून त्यांनी दुसरी गाडी पकडली.

देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या गाडीचा ताफा सोडून खासगी गाडीतून सोफिटल हॉटेलच्या मागच्या दराने आत गेले. या ठिकाणी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सविस्तर चर्चा झाली. अजितदादांनी 38 आमदार फोडण्याची तयारी केली होती. हा सर्व प्रकार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांना सांगण्यात आला होता. 38 आमदारापैंकी 20 जणांना मंत्रिपद देण्याची तयारी झाली होती.

या सर्व घडामोडीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काहीच माहिती नव्हती. यामुळे अजित पवार यांनी खबरदारीने सर्व घडामोडी लपवून ठेवल्या होत्या. यानंतर 23 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. यानंतर शरद पवारांनी जे काही केले आणि राज्यात आघाडीचे सरकार कसे स्थापन झाले ते संपूर्ण राज्याने पाहिले.