मोदी सरकारला मोठा धक्का ! कोरोना संशोधन गटाचे प्रमुख असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा तडकाफडकी राजीनामा, सरकारी धोरणांविषयी व्यक्त केली नाराजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही- 2 जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदाचा साथरोगतज्ज्ञ शाहीद जामील यांनी राजीनामा दिला आहे. देशातील कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही वैज्ञानिकांचा समावेश असलेला गट स्थापन केला होता. जामील हे या गटाचे प्रमुख होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारस त्यांनी हे पद सोडत असल्याचे जाहीर केले आहे. जामील यांनी अशाप्रकारे तडकाफडकी राजीनामा देणे हा केंद्र सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सरकारच्या धोरणावर सातत्याने टीका करत होते.

देशात कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आढळल्यानंतर जानेवारीत आयएसएसीओजीची स्थापना केली होती. विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना केली होती. यात देशातील विविध भागातून विषाणूंची रचना समजून घेण्यासाठी सॅम्पल गोळा करुन 10 प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यावर अभ्यास केला जात होता.

जामील हे कोरोनाच्या साथीसंदर्भात मुक्तपणे आपली मत मांडत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकार कमी पडल्याची टीका त्यांनी अनेकवेळा केली आहे. जामील यांनी नुकतेच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, सरकारी यंत्रणांना कोरोना जानेवारीमध्ये संपला आहे असे वाटले अन् त्या बेजबाबदार झाल्या. त्यामुळेच त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात महिनाभरापूर्वी उभारलेल्या अनेक आरोग्य सुविधा देणारी केंद्र बंद केल्याचे ते म्हणाले. जामील यांनी नुकताच न्यूयार्क टाइम्ससाठी लेख लिहला होता. त्यात त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवणे अन् लोकांना आयसोलेट करण्याचे प्रमाण वाढवण्याची शिफारस केली होती. निवृत्त डॉक्टर आणि नर्सची मदत घेतली पाहिजे, पुरवठा साखळी मजबूत करुन औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला पाहिजे, असे सल्लेही जामील यांनी दिले होते. देशामधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. माणसांच्या रुपाने आपण जे काही गमावतोय त्यामुळे या साथीचे व्रण कायमचे राहणार असल्याचा युक्तीवाद केला होता.