फरार नीरव मोदीला मोठा झटका ! कोर्टाने जप्त केला पूर्ण ‘खजिना’, आता सरकारचा असणार ‘ताबा’

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार करोड रूपयांपेक्षा जास्त घोटाळ्यातील मुख्य आरोपी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला कोर्टाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत खटला सुरू होता. आज पीएमएलए कोर्टाने आदेश दिला की, नीरव मोदीची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी. या आदेशानंतर नीरव मोदीच्या सर्व संपत्तीवर भारत सरकारचा अधिकार झाला आहे.

कोर्टाने आदेश दिला की, नीरव मोदीला फरार घोषीत करण्यात आले आहे. तर, नवा फरार आर्थिक गुन्हेगारी कायदा (एफईओए) त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याची परवानगी देतो. यानंतर कोर्टाने त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुद्धा नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली होती. तर, मार्च, 2020 मध्ये झालेल्या त्याच्या संपत्तीच्या लिलावातून 51 करोड रूपये प्राप्त झाले होते. या संपत्ती ईडीने जप्त केल्या होत्या.

फरार उद्योगपती नीरव मोदीच्या लिलाव करण्यात आलेल्या संपत्तीपैकी रॉल्स रॉयस कार, एमएफ हुसैन आणि अमृता शेर-गिल यांची पेन्टींग्स आणि डिझायनर हँडबॅग यांचा समावेश होता. यापूर्वी सैफरन आर्टने नीरव मोदीच्या मालकी हक्काच्या काही कलाकृतींचा मार्च 2019 मध्ये लिलाव केला होता. यातून 55 करोड आले होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला 14,000 करोड रूपयांपेक्षा जास्त पैशांना फसवल्याचा आरोप आहे. नीरव मोदी देशातून फरार आहे आणि सध्या लंडनच्या जेलमध्ये कैद आहे.