PoK वर लवकरच होईल भारताचा ताबा, तिथं फडकवला जाईल ‘तिरंगा’ : मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचे संसदीय कार्य राज्य मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी गुरुवारी दावा केला की पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) वर लवकरच भारताचा ताबा असेल. शुक्ला म्हणाले, ‘जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटविल्याशिवाय शांतता शक्य नाही.’ शुक्ला यांनी दावा केला की, ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या ताब्यात येईल आणि तेथे तिरंगा ध्वज फडकविला जाईल.’

आफ्रिदी उद्धट खेळाडू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे शुक्ला यांनी ‘उद्धट’ असे वर्णन केले आणि ते म्हणाले की, आफ्रिदीसारख्या लोकांकडून चांगली अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारतविरोधी विधान केले होते. आफ्रिदीने एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर धार्मिक भेदभाव केल्याचा आरोप केला होता. काल हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माजी हॉकी कर्णधार यांनीही केली होती टीका

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि चार ऑलिम्पिक, चार विश्वचषक, चार आशियाई खेळांमध्ये सहभागी झालेल्या महान फॉरवर्ड धनराज यांनी आफ्रिदीवर टीका केली की, ‘आमच्या पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारच्या अपमानास्पद गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. सीमा ओलांडून दहशतवादाला प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नांच्या अपयशामुळे पाकिस्तानाला धक्का बसला आहे.’

हरभजन आणि युवराज यांनी नाराजी व्यक्त केली

शाहिद आफ्रिदीने भारताविरूद्ध केलेल्या निवेदनाबद्दल निराशा व्यक्त करताना भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाले की, हा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मैत्रीस पात्र नाही तर युवराजसिंगने त्याच्या धर्मादाय मदतीसाठी आवाहन केल्याबद्दल खेद व्यक्त केला. गेल्या महिन्यात हरभजन आणि युवराज यांनी ‘शाहिद आफ्रिदी फाउंडेशन’ला पाठिंबा देण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. फाउंडेशन कोविड -19 साथीच्या आजाराने पीडित लोकांसाठी हा निधी गोळा करीत होता.