‘खड्ड्यांसोबत सेल्फी घेऊन निकृष्ठ काम चव्हाट्यावर आणले म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय’ : सुप्रिया सुळे

दौंड : (अब्बास शेख) पोलीसनामा ऑनलाइन – मी रस्त्यांवरील खड्ड्यांसोबत सेल्फी घेऊन सत्ताधाऱ्यांचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर आणले म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे त्यामुळे माझ्या सेल्फीवर विरोधक टीका करत आहेत, पण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांसोबत सेल्फी घेतात तेव्हा त्यांना ते चालतं, असा टोला बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांनी लगावला त्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आमच्या सरकारला सर्व म्हणायचे कि तुम्ही खूप महागाई करून ठेवलीय, परंतु आता भाजप-सेनेचा पाच वर्षाचा कारभार बघता यांनी सर्व ठिकाणी महागाईचा उच्चांक गाठून ठेवलाय असेच सर्वजण म्हणतायेत त्यामुळे आता जर हे बोलले “बहोत हो गई महंगाई कि मार” तर लगेच आपण पुढे म्हणायचं “अब कि बार लांबूनच नमस्कार” असा मार्मिक टोला त्यांनी यावेळी लगावला.

‘मै भी चौकीदार’ या घोषणेची फिरकी घेताना भाजपवाल्यांनो लक्षात ठेवा आम्हाला आमच्या पोरांना चौकीदार नाही तर या देशाचा मालक बनवायचय. असा खरपूस समाचार घेतला.

शेवटी बोलताना त्यांनी “पाच वर्षांपुर्वीच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटच्या मिटींगमध्ये धनगर आरक्षण मंजूर करू. तेव्हा मी माननीय पवार साहेबांना विचारलं होतं कि हे करू शकतात तर आपण का नाही ? तेव्हा पवार साहेब मला म्हणाले होते कि मुख्यमंत्री खोटं बोलतायत निवडणुकीत धनगर समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांची दिशाभूल करत आहेत. आज सद्य:स्थिती पाहीली की कळतंय पवार साहेब तंतोतंत खरं बोलले होते.” अशी आठवण देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी आवर्जून सांगितली.