उस्मानाबाद आणि परंड्यात सेनेच्या पदाधिकार्‍यांची बंडखोरी युतीसाठी डोकेदुखी ठरणार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्ह्यातील चारही मतदार संघात बंडखोरी कायम राहिल्यामुळे लढतीमध्ये चुरस निर्माण होणार आहे. उस्मानाबाद आणि परंडा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केलेली बंडखोरी युतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर उमरगा, तुळजापूरमधून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका आघाडीला सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान चार विधानसभा मतदारसंघातून 31 जणांनी माघार घेतली असून निवडणुकीच्या आखाड्यात 50 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तुळजापूर मतदार संघात सर्वाधिक 18, त्यापाठोपाठ उमरगा आणि उस्मानाबाद मतदार संघात 11, तर परंडा विधानसभा मतदार संघातून 10 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

तुळजापूर विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या 28 पैकी 10 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यानुसार आता तुळजापूर मतदारसंघात 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. तुळजापूर मतदार संघात निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या अपक्ष उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील, धनंजय श्रीमंतराव रणदिवे, राजेसाहेब साहेबराव पाटील, महानंदा गजानन पैलवान, बालाराम धर्मा कोमटी, लोंढे मोहन वर्षेल, चंदनशिवे अरविंद लिंगाप्पा, नेताजी नागनाथराव गोरे, संजयकुमार भागवत वाघमारे व महाराष्ट्र क्रांती सेनेचे ज्योतीबा लिंबाजी पवार या उमेदवारांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे.

विधानसभा मतदारसंघात उमरगा-लोहारा तालुक्यातील तब्बल वीस जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. छानणीत तीन अर्ज बाद ठरल्याने सतरा जण निवडणूक रिंगणात होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात प्रमुख पक्षासह चार अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी निवडणूक कार्यालयात अखेरच्या दिवशी सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. त्यात शिवसेनेतून बंडखोरी केलेले विलास व्हटकर, राम गायकवाड, सुधाकर दामावले, सुभाष कांबळे, संध्या अशोक सरवदे व हणमंत दनाने यांनी माघार घेतली आहे. मतदार संघात शिवसेना, काँग्रेस आणि मनसे, अशी तिरंगी लढत होत असून शिवसेना उमेदवार हॅट्ट्रीक करणार की, यावेळी नवख्या उमेदवाराला संधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात आता 10 उमेदवार राहिले आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करत सूर्यकांत चंद्रकांत कांबळे यांनी शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा तडकाफडकी देऊन त्यांनी वंचित बहुजन अघाडीकडून निवडणूक रिंगणात राहिल्याने युती व आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

सूर्यकांत कांबळे हे धनगर आरक्षणासह सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात आहे. त्यामुळे परंडा विधानसभेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वैशाली मोटे, मारुती काटकर, अब्दुल करीम हावरे, अमीर मुलानी, तानाजी बनसोडे या पाच जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

Visit : Policenama.com