माणुसकी ! अझीम प्रेमजींनी दिलेला शब्द ठरवला खरा, पुण्यात उभारलं 450 बेड्सचं ‘कोरोना’ हॉस्पीटल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईसाठी उद्योग क्षेत्रातील अनेक दानशूर हात पुढे आले. त्यात टाटा, रिलायन्स आणि आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांच देखील नाव आदराने घेतलं जात. आता काही दिवसांपूर्वी याच प्रेमजींनी दिलेल्या शब्द खरा केला आहे. प्रेमजी यांनी भारतातील पहिले केवळ कोरोना संसर्गा विरोधात लढण्यासाठी रुग्णालय उभारलं आहे.

पुण्यात हे रुग्णालय उभं करण्यात आलं असून, या रुग्णालयामध्ये ४५० अद्ययावत बेड्स आणि १८ व्हेंटिलेटर व आयसीयू विभाग असणार आहे. येथे सार्वजनिक-खाजगी सहकार्यातून उपचार करण्यात येतील. विप्रो दोन सुसज्ज अँब्युलन्स पुरवत असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गौरवोद्गार काढले आहे. तसेच हे रुग्णालय कोरोना हेल्थ सेंटर म्हणून ओळखले जाईल असं म्हटलं आहे. सदर रुग्णालय पुण्यातील हिंजवडी भागात तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी आयटी पार्क असून, विप्रोची भलीमोठी आयटी कंपनीची इमारत आहे. यामधील १.८ लाख वर्गफूटची जागा या रुग्णालयासाठी देण्यात आली आहे. विप्रोने ५ मे रोजी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. त्यावेळेस त्यांनी दीड महिन्यात कोरोना संसर्गाशी लढण्याकरिता रुग्णालय उभारणार असल्याचे सांगितले होते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अझीम प्रेमजी यांचा मुलगा रिशद प्रेमजी यांचे आभार मानले आहेत. गुरुवारी या रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले.

रुग्णालयाची वैशिष्ट्ये

४५० खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर स्वरुपातील रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे रुग्णालय कोविड-१९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स आहे. येथील नियुक्त डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या संकुलात २५ उत्तम खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाशी लढण्याकरिता मुक्तहस्ते मदत

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेज लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिलं आहे. या मदतीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग करण्यात येईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल. विप्रो आणि अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसोबत देशभरात मदत कार्य केले असून, आतापर्यंत देशातील ३४ लाखांहून अधिक जणांना ही मदत पोहचली आहे.

कोणी केला करार?

महाराष्ट्र सरकारच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्ह्यादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या.

अझीम प्रेमजींचा दानशूरपणात जगात तिसरा क्रमांक

टाटा उद्योग समूहाचे संचालक रटन टाटा यांच्यानंतर कोरोना संसर्गाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत देशाला मदत करणारे विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी जगात तिसरा क्रमांक पटकवला. कोरोना संसर्गाच्या मुकाबल्यासाठी जगातील ८० अब्जाधीशांनी आपले हात सैल केले आहेत. यामध्ये प्रेमजी सुद्धा मागे राहिले नाहीत. अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधीश ठरले आहेत. पहिल्या क्रमांकावरती ट्विटरचे मालक जॅक डॉर्सी असून दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती भारताचे या यादीतील अब्जाधीश अझीम प्रेमजी आले आहेत. अझीम प्रेमजी यांनी आतापर्यंत १३२ मिलियन डॉलर म्हणजेच एक हजार कोटी रुपयांचे दान केलं आहे.