‘ती’ महिला खंडणीसाठी बदनामी करीत असल्याचा निलंबित सनदी अधिकार्‍याचा आरोप, पोलिसांकडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील एका निलंबित सनदी अधिकार्‍याने महिलेविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली आहे. गोैरव दहिया असे निलंबित केलेल्या सनदी अधिकार्‍याचे नाव आहे. संबंधित अधिकर्‍याने आपल्याशी लग्न केले आणि त्याच्यापासून एक मूलही झाल्याचा लीनू सिंह या महिलेने आरोप केला होता. तिच्या तक्रारीनंतर दहिया यांच्याविरोधात चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालानंतर दहिया यांना ऑगस्ट 2019 मध्ये सेवतून निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणात या महिलेने आपल्याला बदनाम करण्यासाठीच सर्व खाटाटोप करत असल्याचे दहिया यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. दहिया यांनी लीनू सिंग या महिलेचा पती कुुलदीप दिनकर यांच्याविरोधातही तक्रार दिली आहे. दहिया यांनी तक्रारीत म्हटले की, लीनू सिंह हिचे उत्तरप्रदेशमधील कुलदीप दिनकर याच्यासोबत 4 नोव्हेंबर 2015 मध्ये लग्न झाले होते. या दोघांनी आपल्याविरोधात कट रचला आणि आपल्याला बदनाम करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला आहे.