बिग बॉस विजेतीला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस १२’ ची विजेती दीपिका कक्करला बिग बॉसच्याच एका दिग्दर्शकानेच अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर आपण माजी क्रिकेटपटू श्रीसंत याचे चाहते असल्याचे ट्विटद्वारे धमकी देणाऱ्या या व्यक्तीने म्हटले आहे.
 ‘तू कुठेही दिसली, तर तुला अ‍ॅसिड फेकून मारेन’, अशा आशयाचे ट्विट करून बिग बॉसच्याच एका दिग्दर्शकानेच अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली आहे. यावर दीपिकाने काही पाऊल उचलण्याआधी दीपिकाच्या चाहत्याने ट्वीटरद्वारे देण्यात आलेली ही धमकी पाहिली. आणि लागलीच या चाहत्याने पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी देखील या प्रकरणात विशेष लक्ष घालून या तक्रारीची दखल घेतली आहे.
‘कलर्स’ वाहिनी वरील सर्वात प्रसिद्ध रिऍलीटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमाने नुकतेच १२ सिजन पूर्ण केले आहे. हा कार्यक्रम सुरुवातीपासूनच इतर रिऍलीटी शोंपेक्षा टी.आर.पीच्या बाबतीत मागे होता,पण काही ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’मुळे हा शो गाजायला सुरवात झाली. ‘बिग बॉस १२’ सिजनमध्ये कलाकार दीपिका कक्कर आणि माजी क्रिकेटपटू श्रीसंत यांच्यात अंतिम फेरीसाठी मोठी स्पर्धा रंगली होती. या मध्ये दीपिका कक्कर सीजन १२ ची विजेती ठरली. विजेती झाल्यानंतर दीपिका जरी आनंद साजरा करत असली, तरी काहीजण मात्र तिच्या या विजयावर नाराज असल्याचे दिसते.