Bigg Boss फेम अभिजित बिचुकले पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Big Boss fame Abhijit Bichukale) यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ( Pune Graduates’ constituency) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, लोकसभा, विधानसभा निवडणुक लढवून आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. आता ते पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत.

पैसा, सत्तेचा ताकदीसमोर माझी चिकाटी कमी पडते, त्यामुळे माझा पराभव होत आला आहे.परंतू पदवीधरांच्या निवडणुकीत मतदारांनी गांभीर्याने विचार करावा. मी शिक्षण आणि नोक-यांना प्राधान्य देणार आहे. त्यामुळे मला एकदा संधी देऊन पहावी, असे आवाहन बिचुकले यांनी मतदारांना केले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या उमेदवार म्हणून रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या नाव निश्चित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अरुण लाड व उमेश पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. तर भाजपकडून संग्राम देशमुख, महापौर मुरलीधर मोहोळ, शेखर मुंदडा, रवींद्र भेगडे, राजेश पांडे, शेखर चरेगावकर आदींची नावे चर्चेत आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची नावे पाहता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच्यावतीने ही निवडणुक एकत्रितपणे लढविण्यात येणार आहे. महाआघाडी तसेच भाजपच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नाही. तरी येत्या दोन- तीन दिवसात दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. मनसेच्या वतीने रुपाली पाटील- ठोंबरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. ठोंबरे- पाटील या पुण्याच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी विधी क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. दरम्यान सध्या त्या मनसेच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा म्हणून जाबाबदारी सांभाळत आहेत.

पाटील म्हणाल्या, पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेल्या वषर्भरापासून मी तयारी करत आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी या संदर्भात संपर्कात होते. त्यांच्याच आदेशाने पुणे पदवीधर मतदार संघातून अर्ज भरणार आहे. गेल्या काही दिवसात मोबाईच्या माध्यमातून 80 हजार पदवीधरांशी संपर्क साधण्यात यश मिळाले आहे. पुढील काळात अधिक वेगाने पदवीधर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दररम्यान राज्यातील 5 पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.