बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेची बिग बॉसमध्ये पुन्हा ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस मराठी दुसऱ्या सीजनमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले लवकरच बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. रविवारी प्रदर्शित होणाऱ्या बिग बॉसच्या भागात बिचुकले प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिजीत बिचुकले सकाळी ११ वाजताच मुंबईकडे रवाना झाला आहे. आजच त्याची घरात एन्ट्री होणार आहे.

अभिजीत बिचुकलेला पोलिसांनी मंबईतील बिग बॉसच्या घरातून २१ जून रोजी चेक बाऊन्स प्रकरणी ताब्यात घेतलं होतं. बिचुकलेला अटक झाल्यानंतर त्याला खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली होती. दरम्यान बिचुकलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. कारण बिचुकले मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी होती, यामुळेच त्याचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला होता.

रिएन्ट्री करणारा अभिजीत बिचुकले तिसरा स्पर्धक
बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये घरातून अभिजीत बिचुकले, शिवानी सुर्वे आणि पराग कान्हेरे बाहेर पडले होते. यानंतर पराग आणि शिवानी यांची घरात पुन्हा एन्ट्री झाली होती. यातील पराग कान्हेरे दुसऱ्याच आठवड्यात एलिमिनेट झाला. दरम्यान पुन्हा एन्ट्री झालेली शिवानी मात्र अद्याप बिग बॉसच्या घरातच आहे. शिवानी आणि परागनंतर आता घरात पुन्हा एन्ट्री करणारा अभिजीत तिसरा स्पर्धक ठरला आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले ?
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणारा अभिजीत बिचुकले मागासवर्गीय घरात जन्मला आहे. साताऱ्यातील अभिजीतच्या घरात धार्मिक वातावरण असून ज्योतिष हा परंपरागत व्यवसाय आहे. बिचुकले नगरपालिकेत कर्मचारी होता. परंतु सुट्ट्यांच्या कारणांवरुन त्याने सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला. यानंतर तो गाण्यांचे शो आणि ऑर्केस्ट्राचे आयोजन करू लागला. नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदासाठीही त्याने प्रयत्न केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –