बिग बॉस मराठी २ : सुरेखा पुणेकर, अभिजित केळकर, शिवानी सुर्वेंसह (देवयानी) सर्व कलाकारांची घरात जोरदार ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. या यशानंतर बिग बॉसने सिझन दोनची घोषणा केल्यानंतर बिग बॉसच्या घरात कोणकोण जाणार यावर चर्चा रंगली होती. अनेक नावे चर्चेत होती. मात्र, ही उत्कंठा आता थांबली आहे. बिग बॉस मराठी २ सुरू झाले आहे. कलर्स वाहिनीवर काल बिग बॉस मराठी २ चा ग्रँड प्रीमिअर पार पडला. या सोहळ्यात सादरीकरण करून सर्व कलाकारांनी घरात जोरदार एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी घरातील काही सदस्यांमध्ये खटके उडाल्यामुळे आगामी १०० दिवस बिग बॉसच्या घरात काय काय होणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ग्रँड प्रीमिअर शोमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी खास सादरीकरण करत बिग बॉसच्या घरात पहिले पाऊल टाकले. किशोरीला ७ हा लकी नंबर मिळाला आहे. किशोरी शहाणे यांच्या पाठोपाठ अभिनेता दिगंबर नाईक आणि नेहा शितोळे यांनी घरात प्रवेश केला. तत्पूर्वी दिगंबर यांनी बिग बॉसच्या ग्रँड स्टेजवर आपल्या खास शैलीत गाऱ्हाणेही घातले. यानंतर राजकीय नेते अभिजित बिचुकले यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. बिचुकले यांनी नुसकतीच झालेली लोकसभा निवडणूक सांगली आणि सातारा मतदारसंघातून लढवली आहे. राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी फॉर्म भरला होता. या ग्रँड सोहळ्यात आल्यानंतर त्यांनी महेश मांजरेकर यांनी माझ्या पक्षात यावे आणि मुख्यमंत्री व्हावे, अशी ऑफर दिली.

याच सोहळ्यात राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील वीणा जगतापनेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडेने पिंगा ग पोरी पिंगा हे गाणे सादर करत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. देवयानी फेम शिवानी सुर्वेन घरात प्रवेश केला. या ग्रँड प्रीमिअर शामध्ये शिव ठाकरे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी, शेफ पराग कान्हेरे, मैथिली जावकर, माधव देवचक्के, रुपाली भोसले आणि अभिनेता अभिजित केळकर यांनी आपले सादरीकरण करून बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.