धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे तब्बल 7 लाख दुकाने बंद होण्याच्या मार्गावर

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाच्या कहरामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे . लॉकडाऊनमुळे जगातील अर्थव्यवस्था आणि दिग्गज कंपन्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्याचा सर्वाधिक फटका भारतातील किरकोळ दुकानदारांना बसला आहे. अंदाजानुसार, सुमारे सात लाख किरकोळ किराणा दुकाने  बंद होण्याच्या मार्गावर आली आहेत. ही दुकाने घरात किंवा रस्त्यावर आहेत. यामध्ये कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाला असून त्यांची रोजची भाकर यावर अवलंबून असते.

देशात सुमारे एक कोटी लहान किराणा दुकानदार आहेत. यापैकी सुमारे सहा ते सात टक्के लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, म्हणजेच त्यांच्याकडे वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे त्यांना त्यांच्या दुकानात जाता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांची दुकाने दोन महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. लॉकडाऊन काढल्यानंतरही लहान किराणा दुकानदारांसाठी रस्ता सोपा नाही. पैशांचा तुटवडा आणि ग्राहकांची कमतरता हे त्यांच्यासाठी  आव्हान आहे.  किराणा दुकानदार किंवा घाऊक विक्रेते किंवा ग्राहक उत्पादने कंपन्या सात ते 21 दिवस म्हणजे दोन ते तीन आठवड्यांपर्यंत उधारीवर माल पोचवतात. पण सर्वांना अर्थव्यवस्थेच्या अनिश्चिततेची भीती आहे, ज्यामुळे कोणतीही वस्तू उधार मिळणे कठीण होईल.  या दुकानांचे बरेच खरेदीदार परप्रांतीय होते जे आता त्यांच्या घरी गेले आहेत. अशा परिस्थितीत ही दुकाने पुन्हा उघडणे फार कठीण होणार आहे .