एप्रिलपासूनच्या वीज दरवाढीमुळे गरिबांचे कंबरडे मोडले !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमध्ये महावितरणच्या ग्राहकांचे वीज देयक वाढण्यास 1 एप्रिल 2020 पासून झालेली दरवाढ हे एक प्रमुख कारण आहे. त्यानुसार विजेच्या स्थिर आकारासह इतर संवर्गातील दरवाढीने 100 युनिटच्या खालील घरगुती वीज वापर असलेल्यांना सर्वाधिक फटका बसला. तब्बल 17 टक्के दरवाढ ही 30 युनिटच्या खाली वीज वापर असलेल्या गरिबांच्या देयकात झाली आहे.

वीज नियामक आयोगाने राज्यातील विविध ठिकाणी जनसुनावणी घेत 1 एप्रिल 2020 पासूनची दरवाढ जाहीर केली. त्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि वीज नियामक आयोगाने ही दरवाढ अत्यल्प असल्याचा दावा केला होता. परंतु आयोगाने मंजूर केलेल्या वाढीव स्थिर आकारासह इतर दरवाढ मिळून सर्वाधिक विजेचे दर 100 युनिटच्या खाली वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वाढल्याचे आता स्पष्ट होत आहे.

मार्च-2020 मध्ये घरगुती ग्राहकांचा स्थिर आकार 90 रुपये होता. एप्रिल-2020 पासून तो 110 रुपये झाला. दरम्यान, 30 युनिट वीज वापर असलेल्यांना मार्च-2020 मध्ये इंधन समायोजन आकार वगळून स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क असे 255.08 रुपये मासिक देयक येत होते. परंतु 1 एप्रिलच्या दरवाढीनंतर ते 17.01 टक्क्यांनी वाढून (43.38 रुपये) 298.47 रुपये झाले. 100 युनिट वापर असलेल्यांना मार्चमध्ये 606.68 रुपये देयक येत होते. ते 14.91 टक्क्यांनी वाढून 697.16 रुपयांवर (10.62 टक्के वाढ) गेले आहे.

200 युनिट वापर असलेल्या ग्राहकांना पूर्वी 1हजार 561.36 रुपये देयक येत होते. ते आता 10.62 टक्यांनी वाढून 1,727.24 रुपयांवर गेले आहे. 300 युनिटच्या ग्राहकांना पूर्वी 2,516.04 रुपये देयक येत होते. राज्यात महावितरणचे सर्वच संवर्गातील एकूण 2.60 कोटी वीज ग्राहक आहेत. त्यातील भिवंडी वगळून सुमारे 2 कोटी ग्राहक घरगुती संवर्गातील आहेत. यापैकी 58 लाख घरगुती ग्राहक महिन्याला 30 युनिटच्या खाली तर दीड कोटी ग्राहक 100 युनिटच्या खाली वीज वापर करतात. दीड कोटी ग्राहकांत 30 युनिटच्या खालील 58 लाख ग्राहकांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यातील गरीब व सामान्य कुटुंबातील ग्राहकांनाच सर्वाधिक वीज दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.