अभिनेता अक्षत उत्कर्षचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांनी पोलिसांवर तपास करत नसल्याचा केला आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबईच्या अंधेरी भागात 26 वर्षीय अभिनेता अक्षत उत्कर्ष चौधरीच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री अक्षतने अंधेरी येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून घेतला. तो मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा होता.

अक्षतच्या शवविच्छेदनानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला, त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह बिहार येथे नेला. या प्रकरणात कुटुंबियांनी मुंबई पोलिसांवर चौकशी न केल्याचा आरोप केला आहे. अक्षतचा मृत्यू संशयास्पद असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे.

लखनौहून एमबीए शिकणारा अक्षत भोजपुरी चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला होता. तो मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर भागातील होता. वडिलांचे नाव राजू चौधरी आहे. अक्षत गेली 2 वर्षे मुंबईत होता आणि अंधेरी पश्चिम येथील सुरेश नगर येथे भाड्याने असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होता.

अक्षतचे काका विक्रम किशोर यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अक्षतसोबत आणखी एक अभिनेत्री स्नेहा चौहान राहायची. स्नेहा चौहान आणि अक्षतचे जवळचे संबंध होते. याशिवाय काका विक्रम चौहान यांनी देखील अक्षतच्या एमबीएची वर्गमित्र असलेली आकांक्षा दुबे नावाच्या आणखी एका मुलीबद्दल सांगितले आहे.

अक्षतच्या मृत्यूची माहिती त्याच्या गिर्लफ्रेंडने पोलिसांना दिली होती. तिच्या म्हणण्यानुसार अक्षत मुंबईतल्या एका खासगी कंपनीत काम करण्याबरोबरच ऍक्टिंगही करत होता. आगामी ‘लिट्टी चोखा’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली होती. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षतची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पोलिसांनी सांगितले की त्याने टॉवेल्सने फाशी घेतली.