Bihar Assembly Election 2020 : नोकरीही गेली अन् उमेदवारीही ! आता गुप्तेश्वर पांडे करणार काय ?

पाटणा : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वाद सुरू झाल्यानंतर पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे बरेच चर्चेत राहिले. बिहार विधानसभा निवडणूक (bihar assembly election 2020) जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयुमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयुनं विधानसभा निवडणुकी (bihar assembly election 2020) साठी आज जाहीर केलेल्या 115 उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नसल्यानं आता पांडे यांचं काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक असलेले गुप्तेश्वर पांडे पोलीस सेवेतून अचानक स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत दणक्यात जेडीयु प्रवेश केल्यानं त्यांना विधानसभेचं तिकीट मिळणार हे नक्की मानलं जात होतं. मात्र आता ही शक्यता मावळताना दिसत आहे. कारण जेडीयुनं पांडे यांना तिकिट दिलेलं नाही.

जेडीयुनं तिकीट न दिल्यानं आता नोकरही गेली आणि विधानसभेची उमेदवारीही गेली अशी अवस्था झालेल्या गुप्तेश्वर पांडेंना आता भाजपचा आधार मिळू शकतो. बक्सर जिल्ह्यातील ब्रह्मपूर आणि बक्सर हे मतदारसंघ भाजपकडे असून तिथून भाजपनं आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळं आता गुप्तेश्वर पांडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे.

दरम्यान पांडे यांना वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातून होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. ही जागा जेडीयु खासदार वैद्यनाथ प्रसाद महतो यांच्या निधनामुळं रिक्त झाली आहे. या ठिकाणी 13 ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघावर एनडीएचा कब्जा आहे. मात्र या जागेवर वैद्यनाथ प्रसाद महतोंच्या मुलांची पहिली दावेदारी आहे. महतोंची दोन मुलं व्यावसायिक आहेत. तर सुनील कुमर हा तिसरा मुलगा राजकारणात सक्रिय आहे.