Bihar Election Results : बिहारच्या जनतेला ‘विकास’ हवा, जंगलराज नकोय

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाइन – बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून, जंगलराज नको आहे हे दाखवून दिलं. आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेने पूर्ण विश्वास टाकला आहे. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो, अशा शब्दांत बिहार निवडणुकीची धुरा सांभाळणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार जनतेचे आभार मानले आहे. निकालानंतर फडणवीस यांनी ट्विट केले आहे.

ते म्हणाले की, बिहारमध्ये भाजपने ११० जागांवर निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजयाची टक्केवारी ६७ टक्के इतकी असून, २०१५ मध्ये हीच टक्केवारी ३४ इतकी होती. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या गरीब कल्याणकारी योजना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं. मी बिहारमधील भाजपच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. संपूर्ण बिहारने कोरोना काळातदेखील उत्साहाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवून जगाला एक आदर्श घालून दिला. या यशस्वी निवडणुकीसाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो.

देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपने मोठं यश मिळवलं आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतीक आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यांतील आमच्या भाजप कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो, असंही ते म्हणाले.

भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश मिळवले आहे. २० वर्षांत पहिल्यांदाच भाजप मोठा पक्ष ठरला असून, या यशामागे फडणवीस यांची रणनिती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कोरोनामुळे त्यांना प्रचारातून मागे यावे लागले होते.