Bhagalpur : ‘तू तर मला विसरलीच आहेस…’ असं लिहून 12 वीच्या विद्यार्थ्यानं दिला जीव

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या भागलपूर येथील 12वी च्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह रूम मालकाने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला तर त्यांना धक्का बसला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट देखील सापडली त्यानुसार विद्यार्थ्याने त्याच्या गर्लफ्रेंडमुळे आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या मित्राच्या मोबाईलवरून गर्लफ्रेंडसोबत जवळपास अर्धा तास संवाद साधला. त्याच्या मित्राकडून तो प्लॅस्टिकची खुर्ची देखील घेऊन गेला होता.

युटिलिटी पॉवर टेक लिमिटेडचे डेप्युटी मॅनेजर उमाकांत यांचा 18 वर्षीय मुलगा निशांत उर्फ गोलू इयत्ता 12 वीचा विद्यार्थी होता. निशांत टीएनबी लॉ कॉलेजच्या मागे सुरखीकल भट्‌ठा परिसरातील एका खासगी शाळेत शिकत होता. शिक्षक उमेश तिवारी यांच्या घरी निशांत भाड्याने खोली घेऊन राहत होता. ही घटना सोमवारी उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी शेजारी व रूम मालकाने पंख्याला लटकलेला त्याचा मृतदेह पाहताच पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची पाहणी केली.

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोट मिळाली, ज्यामध्ये निशांतने आपल्या मृत्यूसाठी त्याच्या गर्लफ्रेंडला जबाबदार असल्याचे सांगत लिहिले की, ‘तू मला पूर्णपणे विसरलीस. आज एका मुलाच्या प्रेमात फसली आहेस. मला तर सोडलेच आहे. मी म्हणत होतो ना की तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तू तुझ्या आयुष्यात फक्त आनंदी रहा, सॉरी टू ऑल ऑफ यू. सॉरी मम्मी…आय लव्ह यू मम्मी…’ तसेच निशांतच्या शेजारच्या खोलीत राहणारा त्याचा मित्र कन्हैयाने सांगितले की, निशांत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्याच्या खोलीत आला होता. त्याच्याकडून मोबाइल मागितला आणि एका नंबरवर जवळपास अर्धा तास बोलला. यानंतर प्लास्टिकची खुर्चीही मागितली आणि सोबत घेऊन गेला.

त्याचवेळी निशांतच्या मृत्यूची माहिती मिळताच वडील उमाकांत मंडल, आई, एसएसपी कार्यालयातील हिंदी शाखेत कार्यरत असलेली मावशी कांचन आणि इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. निशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहून वडील व इतर नातेवाईकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. नातेवाईक रूम मालकावर संताप व्यक्त करू लागले. जेव्हा निशांतची सुसाइड नोट पाहिली तेव्हा कुटुंबास झालेला प्रकार समजण्यास फार वेळ लागला नाही. निशांतने स्वत:च्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. निशांतचा मोबाइल गहाळ आहे. पोलिस आता निशांतच्या हरवलेल्या मोबाईलची कॉल डिटेल्स काढतील.