काय सांगता ! होय, 40 चपात्या अन् 10 प्लेट राईस एकटाच फस्त करतोय क्वारंटाईन सेंटरमधील ‘हा’ तरूण

पटना : वृत्तसंस्था – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तयार केलेल्या क्वारंटाइन केंद्राची बरीच चित्रे पाहिली असतील आणि अनेक गोष्टी ऐकल्या असतील. परंतु आता अशी एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीच्या आहाराबद्दल समजल्यास कोणालाही धक्का बसेल. ही गोष्ट बक्सरचा २१ वर्षीय अनुप ओझा याच्याबद्दल आहे, जो सध्या आपल्या आहाराविषयी देशभर चर्चेचा विषय ठरत आहे.

२१ व्या वर्षात १० लोकांचे जेवण
या तरुणाचे जेवण दोन किंवा तीन नाही तर १० जणांएवढे आहे. परदेशातून परतल्यावर जेव्हा अनूपला त्याच्या भागातील एका शाळेत क्वारंटाइन करण्यात आले, तेव्हा त्याचे खाणे पाहून अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांनाच धक्का बसला. खरं तर, हा २१ वर्षांचा तरुण एकाच वेळी १० लोकांएवढे जेवण जेवतो. मग चपाती असो किंवा भात अनुपचा आहार हा सर्वसामान्यांपेक्षा दहापट जास्त असतो. एका दिवशी तर अनूपने रात्रीच्या जेवणाच्या वेळी बिहारच्या प्रसिद्ध भोजन लिट्टी-चोखाच्या मेनूमधील ८५ लिट्टी संपवल्या.

असा आहे आहार
अनुप सहसा एकावेळी आठ ते दहा प्लेट भात किंवा ३५-४० चपात्या आणि डाळ-भाजी खातो. बक्सरमधील मंजवारी येथील शासकीय विद्यालयात बनवलेल्या क्वारंटाइन केंद्रामध्ये राहणाऱ्या प्रवासी तरूण अनुप ओझाचे अन्न बनवण्यासाठी विभागातील लोकांना घाम फुटतो. जेव्हा तरूणाच्या आहाराबाबत गडबड झाली, तेव्हा स्वतः अधिकारी देखील तरूणाला भेटण्यास आले, पण त्याचे जेवण पाहून त्यांनाही धक्का बसला.

कामा-धंद्यासाठी गेला होता राजस्थानला
अनूप हा बक्सर जिल्ह्यातील सिमरीमधील खरहाताड गावात राहणारे गोपाळ ओझा यांचा मुलगा आहे आणि तो घरी जाण्यासाठी एका आठवड्यापूर्वी क्वारंटाइन केंद्रात आला आहे. कुटुंबियांनी सांगितले की, अनुप लॉकडाऊनपूर्वी कामाच्या शोधात राजस्थानला गेला होता. पण याच दरम्यान संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आणि दीड महिन्यांहून अधिक काळ तो राजस्थानमध्येच अडकला.

शर्यतीत १०० सामोसे खातो
अनुप ज्या केंद्रात आहे त्या केंद्रात ८७ प्रवासी आहेत, पण अनुपचा आहार जास्त असल्याने जेवण १०० हून अधिक लोकांचे बनते. त्याच्या गावातील लोकांचेही म्हणणे आहे की, तो सुरुवातीपासूनच जास्त खातो. शर्यत लावल्यावर तो एका वेळी सुमारे १०० समोसे खातो. सध्या विभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर केंद्रातील नियुक्त कर्मचार्‍यांना त्याला भरपूर भोजन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.