‘या’ नेत्यामुळे प्रशांत किशोर जेडीयूमध्ये, नितीश कुमार यांचा ‘मोठा’ खुलासा

पाटणा : वृत्तसंस्था – सीएए आणि एनआरसी नोंदणीवर जनता दलाचे नेते आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशावर बिहारचे मुख्यमंत्री आणि जलता दलाचे (यु) अध्यक्ष नितीश कुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रशांत किशोर यांना जनता दल (यु) मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा याच्या सांगण्यावरून घेतला असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी काही वर्षे राजकीय रणनितीकार म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल (यु) या पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने अनेकांच्या भुवया उचावल्या होत्या. प्रशांत किशोर हे मागील काही दिवसांपासून भाजप विरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूच्या युतीची सत्ता आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना नितीश कुमार यांनी सांगितले की, पक्षात राहण्याची ज्यांची इच्छा असेल तो पक्षात राहिल. ज्यांची इच्छा नसेल ते पक्ष सोडून जातील. आम्ही सामान्य माणसं असून आमचा पक्ष मोठ्या माणसांचा पक्ष नाही. मात्र, आम्ही सर्वांचा सन्मान करत असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. प्रशांत किशोर हे पक्षात कायम राहिले तरी आम्हाला काही त्रास नाही आणि सोडून गेले तरी काही विशेष त्रास होणार नसल्याचे सूचक विधान नितीश कुमार यांनी केले. यावरून नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये सध्या अलबेल नसल्याचे स्पष्ट होते.