Coronavirus : बिहारमध्ये 24 तासात 130 ‘कोरोना’चे रुग्ण, राज्यातील सर्व जिल्हे COVID-19 च्या विळख्यात

पाटणा : वृत्त संस्था – दिल्लीसह कोरोना बाधित शहरातून कामगार राज्यात आले तर कोरोनामुक्त असलेली बिहारमधील गावात कोरोनाचा शिरकाव होईल, अशी भिती व्यक्त केली जात होती. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बिहारमध्ये येणार्‍या रेल्वेगाड्यांना परवानगी देत नव्हते. अखेर दबावामुळे त्यांना परवानगी द्यावी लागली. आणि जी भिती व्यक्त करण्यात येत होती. ती खरी ठरली. बिहारमध्ये गेल्या २४ तासात सर्वाधिक १३० कोरोना बाधित आढळून आले. त्यापैकी १२४ हे बाहेरील राज्यातून बिहारमध्ये आले होते. बिहारमधील आता सर्व जिल्हे हे कोरोना बाधित झाले आहेत. असे असले तरी अन्य राज्यांच्या मानाने बिहारमध्ये कोरोना बाधितांची संख्या ८०० वर गेली आहे.

बिहारमध्ये आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या मर्यादित होती. दररोज कोरोना बाधित आढळून येणार्‍यांची संख्याही कमी होती. देशभरातील राज्यांमध्ये बिहार हा कोरोना बाधितांच्या संख्येत १४ व्या स्थानावर आहे. त्यामुळे अन्य राज्यातून बिहारमध्ये कामगारांना स्वघरी येण्यास विरोध केला जात होता. तसेच जिल्हा बंदीही लागू करण्यात आली होती.

मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आमदारांच्या मागणीवरुन राज्यांतर्गत जिल्हा बंदी मागे घेण्यात आली. त्यातून अन्य राज्यातून बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार घरी परतू लागले आहेत. तसेच आंतरजिल्हा वाहतूकही सुरु झाली आहे. बिहारमध्ये एकाच दिवशी १३० जण कोरोना बाधित आढळून आले होते. त्यापैकी १२४ जण हे प्रवासी कामगार होते. त्याचा परिणाम बिहारमधील सर्व जिल्हे हे आता कोरोनाग्रस्त झाले आहेत.